-कार्यकर्त्यांना घातली साद
(Image Source-Internet)
मुंबई :
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदात बदल झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा आढावा घेत कार्यकर्त्यांसाठी एक हृदयस्पर्शी पत्र लिहिलं आहे. रविंद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्तीनंतर बावनकुळे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानत आणि दिलगिरी व्यक्त करत भावनिक शब्दांत निरोप दिला आहे.
पत्रात त्यांनी आपल्या तीन दशकांच्या राजकीय प्रवासाचा उहापोह केला आहे. "कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे..." या कवी ना.धो. महानोर यांच्या ओळी उद्धृत करत त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या.
बावनकुळे यांनी सांगितलं की, “मी साधारण ३५ वर्षांपूर्वी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सार्वजनिक जीवनात आलो. पक्षाच्या विचारसरणीचा प्रचार करत गावोगाव सायकलवरून, मोटरसायकलवरून किंवा पायी प्रवास केला. तिथून सुरू झालेला प्रवास भाजपच्या राज्याध्यक्षपदापर्यंत पोहोचेल, याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता.”
१२ ऑगस्ट २०२२ रोजी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना झालेल्या भावना आणि जबाबदारीच्या दडपणाचाही त्यांनी उल्लेख केला. “या पदावरून अनेक दिग्गजांनी पक्षाला दिशा दिली आहे. त्या परंपरेची साखळी टिकवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. राज्यभर दौरे करताना कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला होता. बूथ पातळीपासून वरिष्ठ नेतृत्वापर्यंत समन्वय साधून पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला,” असं ते म्हणाले.
बावनकुळे यांनी नमूद केलं की, त्यांच्या काळात लोकसभा व विधानसभा अशा दोन निवडणुका पार पडल्या. “लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही, मात्र त्यातून शिकून, आत्मपरीक्षण करून विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं. महायुतीच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्ता मिळवण्यात आपण यशस्वी ठरलो, याचं श्रेय केवळ आपल्या मेहनती कार्यकर्त्यांना जातं,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
ते पुढे म्हणाले, “मोदींनी आखलेल्या विकसित भारताच्या स्वप्नात राज्याध्यक्ष म्हणून काही प्रमाणात योगदान देण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी गौरवाचं होतं. आता महसूल मंत्री म्हणूनही पक्ष व जनतेची सेवा करण्याची संधी मिळते आहे.”
पत्राच्या समारोपात बावनकुळे म्हणाले, “या प्रवासात माझ्याकडून नकळत काही चुका झाल्या असतील, कुणाला दुखावलं असेल तर मनापासून माफी मागतो. वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा मी सदैव प्रयत्न केला. पक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या साथीसाठी मी कृतज्ञ आहे. ‘राष्ट्र प्रथम, मग पक्ष, आणि मग स्वतः’ हे मूल्य जपत मी पुढेही निष्ठेने कार्य करत राहीन.”