ड्रग्स तस्करीविरोधात मोठा निर्णय; मकोका कायद्यांतर्गत होणार कठोर कारवाई, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा

02 Jul 2025 15:33:22
 
CM Fadnavis
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या ड्रग्स तस्करीवर (Drug trafficking) आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली. यानुसार, आता ड्रग्स तस्करीत गुंतलेल्या व्यक्तींवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मकोका) अंतर्गत थेट कारवाई केली जाणार आहे.
 
विधान परिषदेत एमडीसारख्या घातक ड्रग्सच्या वाढत्या तस्करीवर चर्चा झाली. यावेळी अनेक सदस्यांनी कठोर उपाययोजनांची मागणी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ड्रग्समुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी मकोका लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठीची नियमावली लवकरच विधानसभेत सादर केली जाईल.
 
ड्रग्सविरोधात स्वतंत्र युनिट सक्रिय; फास्ट ट्रॅक न्यायालयाची शिफारस
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात अंमली पदार्थांविरोधात स्वतंत्र युनिट कार्यरत असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापे टाकण्यात आले आहेत. तसेच गंभीर गुन्ह्यांसाठी केंद्र सरकारकडे फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची मागणीही सरकारने केली आहे, जेणेकरून दोषींना लवकर शिक्षा होऊ शकेल.
 
भाजप आमदार परिणय फुके यांनी यावेळी ड्रग्स तस्करी करणाऱ्यांना लवकर जामीन मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांच्यावर मकोका लागू करण्याची शिफारस केली. यासोबतच, पूर्वी स्थापन करण्यात आलेल्या ड्रग्सविरोधी टास्क फोर्सबाबतची माहितीही त्यांनी मागितली.
 
सीमावर्ती भागांत अफू व गांजाची तस्करी – मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती भागांत अफू आणि गांजाची तस्करी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, इतर काही राज्यांत भांगसारख्या पदार्थांना कायदेशीर परवानगी असली तरी महाराष्ट्रात अशा कोणत्याही अंमली पदार्थांना अनुमती नाही. मुक्ताईनगर परिसरात अशा घटनांची माहिती असल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
राज्य सरकारकडून ड्रग्सविरोधात आता निर्णायक लढाई सुरु करण्यात आली आहे. फक्त कायद्याचा विषय न मानता सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने ही लढाई महत्त्वाची असून, मकोका लागू करण्याचा निर्णय तस्करांविरोधात एक मजबूत पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0