(Image Source-Internet)
नागपूर :
राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार हनीट्रॅपमुळेच कोसळले, असा दावा त्यांनी केला असून, एकनाथ शिंदेंच्या नाशिकमधील कथित प्रकरणाची सीडी आमच्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
शिंदेंच्या सीडीमुळेच सत्तांतर घडलं-
वडेट्टीवार म्हणाले, “राज्यात जे सत्तांतर झालं, ते फक्त राजकीय मतभेदांमुळे नव्हे, तर एका गंभीर हनीट्रॅप प्रकरणामुळे. नाशिकमधील एका सीडीमुळे शिंदे गटाने उठाव केला आणि सरकार कोसळले. ती सीडी आम्ही सध्या उघड करत नाही, पण योग्य वेळी सर्व काही समोर आणू.”
हे पुरावे सर्वांसाठी नसेल, खास पाहुण्यांसाठीच-
या प्रकरणाचे पुरावे किती ठोस आहेत, यावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले, “त्या सीडीमधील गोष्टी इतक्या धक्कादायक आहेत की ती पाहण्यासाठी हजारोंचं तिकीट लावावं लागेल. ती माहिती सर्वसामान्यांसाठी नसेल, केवळ आमंत्रित लोकांनाच दाखवली जाईल.”
नाना पटोले यांच्या विधानाला पाठिंबा-
या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही विधानसभेत आवाज उठवला होता. त्यांनी मंत्रालय, नाशिक आणि ठाणे येथे हनीट्रॅपच्या जाळ्याचा आरोप केला होता. त्यांनी सभागृहात पेनड्राइव्हही दाखवली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आरोपांची थट्टा करत म्हटले होते की, "नाना पटोलेंचा बॉम्ब आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही."
लोकसभा विजयामुळे आम्ही गाफील झालो-
विधानसभा निवडणुकीतील अपयशावर वडेट्टीवार म्हणाले, “भारत आघाडीने लोकसभेत चांगलं प्रदर्शन केलं आणि त्याचा अतिआत्मविश्वास आमच्यावर आला. प्रचाराऐवजी आम्ही ४० दिवस चर्चा आणि जागा वाटपात घालवले. प्रत्येक पक्ष जास्त जागा हवी म्हणून आग्रह धरत होता. त्यामुळे एकसंध रणनीतीच तयार होऊ शकली नाही.”