(Image Source-Internet)
नागपूर :
शहरातील मद्यधुंद वाहनचालकांविरोधात ट्राफिक विभागाने राबवलेल्या ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U Turn) या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. १० जुलैपासून सुरू झालेल्या या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण १,३३९ वाहनांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये ३३६ जण नशेच्या अवस्थेत वाहन चालवत असल्याचे आढळले.
नाकाबंदी मोहिमेत इंदोरा ट्राफिक शाखेने सर्वाधिक सक्रियता दाखवली. इथे ३६७ वाहनांची तपासणी करण्यात आली आणि ७१ वाहनचालक नशेत असल्याचे निष्पन्न झाले.
याखालोखाल सोनेगाव (वर्धा रोड) विभागात ४२, कामठी व एमआयडीसी या भागांमध्ये प्रत्येकी ४० आणि लकडगंज परिसरात ३६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
कॉटन मार्केट शाखेने २७५ वाहनांची तपासणी करताना २३ चालक नशेत आढळले. एमआयडीसी विभागात मात्र १२९ वाहनांपैकी तब्बल ४० चालक मद्यधुंद होते.
सीताबर्डी विभागात फक्त २५ वाहनांची तपासणी झाली असली तरी त्यातील १८ चालक हे नशेत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच अजनी भागात १२३ वाहनांपैकी २६ आणि सक्करदरा विभागात १४७ वाहनांपैकी २१ जणांनी नशेत गाडी चालवली होती.
सर्व दोषींवर दंडात्मक कारवाई करत ट्राफिक पोलिसांनी दंड वसूल केला आहे. हे अभियान यापुढेही अधिक तीव्रतेने राबवले जाईल, असा इशारा ट्राफिक विभागाने दिला आहे.