नागपूरमधील अपघातग्रस्त ठिकाणांवर तातडीने उपाय करा; आमदार प्रवीण दटके यांची विधानसभेत मागणी

19 Jul 2025 22:01:05
 
Praveen Datke
 (Image Source-Internet)
मुंबई :
नागपूर शहरात अपघातांची संख्या झपाट्याने वाढत असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्लॅक स्पॉट्स म्हणजेच अपघातप्रवण ठिकाणांची तात्काळ तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके (Praveen Datke) यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत केली.
 
दटके यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात अनेक वेळा बैठक घेतल्या असून, नागपूरमधील अपघातप्रवण ठिकाणांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), परिवहन विभाग आणि नागपूर महानगरपालिकेला योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामासाठी केंद्र सरकारने निधीही मंजूर केला आहे.
 
तथापि, १६ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेचे चंद्रशेखर मोहिते आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांनी संबंधित विभागांना स्पष्ट आदेश दिले होते. पण अद्यापही प्रत्यक्षात काहीही अंमलबजावणी झालेली नाही, असे दटके यांनी स्पष्ट केले.
 
अनधिकृत पार्किंगवरही चिंता-
दटके यांनी नागपूर शहरात अनधिकृत पार्किंगच्या समस्येकडेही लक्ष वेधलं. अशा पार्किंगमुळे वाहतूक खोळंबते आणि अपघाताची शक्यता वाढते, त्यामुळे महापालिकेने आणि वाहतूक विभागाने कठोर पावले उचलावीत, अशीही त्यांनी मागणी केली.
 
निधी आणि अंमलबजावणीची मागणी-
राज्य सरकारने या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष द्यावे, आणि अपघात कमी करण्यासाठी ब्लॅक स्पॉट्सवर आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम भूमिका आमदार दटके यांनी सभागृहात मांडली.
Powered By Sangraha 9.0