(Image Source-Internet)
राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असताना, परभणी जिल्ह्यातून काँग्रेससाठी (Congress) चिंतेची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार आणि सध्या जिल्हाप्रमुख असलेले सुरेश वरपूडकर हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, वरपूडकर यांनी नुकतीच मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेला अधिकच पुष्टी मिळाली आहे. भेटीत परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर तसेच भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेही उपस्थित होते.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, सुरेश वरपूडकर येत्या २४ जुलै रोजी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जर हे खरे ठरले, तर परभणी जिल्ह्यातील काँग्रेसची मते विभागली जाण्याची शक्यता आहे. वरपूडकर हे काँग्रेसमध्ये प्रभावी नेते म्हणून ओळखले जात असल्यामुळे त्यांच्यासोबत अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही भाजपकडे झुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना हा राजकीय बदल काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो. वरपूडकर यांच्या निर्णयामुळे परभणीतील राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.