(Image Source-Internet)
नागपूर :
महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter session) यंदा ८ डिसेंबरपासून उपराजधानी नागपुरात भरवले जाणार आहे. गुरुवारी मुंबईत विधानभवनात झालेल्या कार्यमंत्रणा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि संसदीय कार्यमंत्रीही उपस्थित होते.
अधिवेशनाचा कालावधी तीन आठवडे?
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, यंदाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून सुरू होऊन २६ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. मागील दोन अधिवेशनांप्रमाणेच यंदाही तीन आठवड्यांचा कालावधी ठेवण्यात येईल, असे संकेत मिळाले आहेत. नागपूरसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्वाच्या शहरात होणाऱ्या या अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे.
मान्सून अधिवेशन अंतिम टप्प्यात
दरम्यान, राज्यातील सध्याचे मान्सून अधिवेशन अंतिम टप्प्यात आहे. ३० जूनपासून सुरू झालेल्या या अधिवेशनाचा समारोप १८ जुलै रोजी होणार आहे. एकूण १७ दिवस चाललेल्या या सत्रात विविध मुद्द्यांवर तीव्र चर्चा झाली. त्रिभाषिक फलक, शेतकरी प्रश्न, महागाई, महिला सुरक्षेसारख्या विषयांवर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्याला सत्ताधाऱ्यांनीही ठाम प्रत्युत्तर दिले.
हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा राजकीय वादळे उठण्याची शक्यता असून आगामी अधिवेशनात राज्यातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची अपेक्षा आहे.