नागपूरच्या विधानभवन परिसराचे रूप पालटणार; नव्या इमारतींचा आराखडा सादर

    17-Jul-2025
Total Views |
 
Nagpur Vidhan Bhavan
 (Image Source-Internet)
मुंबई :
नागपूरमधील (Nagpur) ऐतिहासिक विधानभवन परिसर लवकरच नव्या रूपात दिसणार आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसराच्या विस्तारीकरणाचा आणि नव्या प्रशासकीय इमारतींचा सविस्तर आराखडा बुधवारी मुंबईतील विधानभवनात सादर करण्यात आला. “हे प्रकल्प नागपूरच्या गौरवशाली वारशाला साजेसं आणि भविष्यातील गरजांसाठी उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने व्हावा,” अशी अपेक्षा अध्यक्ष नार्वेकर यांनी व्यक्त केली.
 
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी या प्रकल्पाचा आराखडा सादर केला.
 
नव्या आराखड्यानुसार सध्याच्या विधानभवन जागेवर सात मजली भव्य इमारत उभारली जाणार असून तिची वास्तुशैली ऐतिहासिक वारशाला अनुसरून ठेवली जाणार आहे. या नव्या इमारतीत विधानसभा, विधान परिषद, सेंट्रल हॉल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती आणि विरोधी पक्षनेत्यांचे दालन एकत्रित असतील.
 
त्याशेजारीच मंत्रिमंडळ सदस्यांसाठी स्वतंत्र सहा मजली इमारत उभारण्यात येणार आहे. यासोबतच वाहनतळ, उपहारगृह, अभ्यागत कक्ष, सुरक्षा कक्ष यांसारख्या सुविधा देखील प्रस्तावित आहेत.
 
याशिवाय, शासकीय मुद्रणालयाची जागा विधिमंडळासाठी हस्तांतरित करण्यात आली असून, तिथे सुमारे चार लाख चौरस फुट क्षेत्रफळाच्या चौदा मजली भव्य प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या दोन्ही इमारतींना भुयारी टनेलने जोडले जाणार आहे, जेणेकरून अधिक सुलभ व सुरक्षित दळणवळण शक्य होईल.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी “विस्तारीकरण करताना पर्यावरणस्नेही ‘हरित इमारत’ संकल्पना राबवावी. अभ्यागतांसाठी आरामदायी जागा, आधुनिक उपहारगृहाची सुविधाही असावी,” असे स्पष्ट निर्देश दिले.
 
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार असून, सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अध्यक्ष नार्वेकर यांनी दिले आहेत. नागपूरच्या राजकीय आणि प्रशासकीय जीवनाचा केंद्रबिंदू असलेल्या विधानभवनाच्या चेहऱ्यात हे विस्तारीकरण ऐतिहासिक बदल घडवून आणणार आहे.