मुख्यमंत्री फडणवीस यांची नागपूर विभागातील भाजप आमदारांसोबत बैठक; बावनकुळेंसह प्रदेशाध्यक्ष चव्हाण उपस्थित

    17-Jul-2025
Total Views |
 
CM Devendra Fadnavis meets
 (Image Source-Internet)
मुंबई :
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सध्या सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नागपूर विभागातील भाजपच्या आमदारांसोबत बैठक घेऊन आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. ही बैठक मुंबईतील विधान भवनात पार पडली.
 
या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याने मुख्यमंत्री फडणवीस सध्या राज्यातील सर्वच भाजप आमदारांसोबत नियमित संवाद साधत आहेत.
 
बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक आमदाराकडून त्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. तसेच त्यांनी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी सुरू करण्याचे आणि पक्ष संघटनेसोबत समन्वय साधत कार्य करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्र्यांनी आमदारांना “जमिनीवर उतरा, जनतेच्या अडचणी समजून घ्या आणि भाजपची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवा,” असा संदेश दिला. संघटनेच्या माध्यमातून लोकांशी अधिक प्रभावी संवाद साधावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
भाजपने आगामी महत्त्वाच्या स्थानिक निवडणुकांत सशक्तपणे उतरावे आणि संघटनेचा कणा अधिक भक्कम करण्यासाठी तयारी सुरू ठेवावी, असा हा बैठकीचा मुख्य उद्देश होता.