
(Image Source-Internet)
नागपूर:
नागपूरमध्ये (Nagpur) युनियन बँकेच्या वर्तनामुळे राज्यभाषा मराठीचा अपमान झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना केवळ एफआयआर मराठीत असल्याचं कारण देत विमा भरपाई नाकारण्यात आली. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) संतप्त प्रतिक्रिया देत बँकेविरोधात आंदोलन छेडले.
८ जुलै रोजी विशाल बोपचे या युवकाचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्याकडे युनियन बँकेचं एटीएम कार्ड होतं, ज्यावर अपघात विमा लागू होता. त्याच्या कुटुंबीयांनी नियमाप्रमाणे विमा दावा सादर करत एफआयआर दिला. मात्र बँकेने "एफआयआर मराठीत आहे, म्हणून तो ग्राह्य नाही," असं कारण देत भरपाई नाकारली.
सामान्यतः एफआयआर मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये असतो. तरीही फक्त भाषेच्या आधारे दावा फेटाळल्यामुळे विशालच्या कुटुंबाला अन्याय सहन करावा लागला.
या प्रकाराच्या निषेधार्थ मनसेचे पदाधिकारी नागपूरच्या सेमिनरी हिल्स येथील युनियन बँक शाखेत धडकले. बँक व्यवस्थापकाला जाब विचारण्यात आला आणि मराठी भाषेच्या अवमानाविरोधात जोरदार आवाज उठवण्यात आला.
मनसेने स्पष्ट केलं की, "मराठी ही राज्याची अधिकृत भाषा असून तिचा अवमान सहन केला जाणार नाही. बँकेच्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे."
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकिंग यंत्रणा, प्रशासन, आणि विमा कंपन्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मराठी भाषेतील दस्तऐवज नाकारणं म्हणजे केवळ कायद्याचा नाही, तर जनतेच्या आत्मसन्मानाचा अपमान असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत.
मनसेने हा विषय उच्च न्यायालय किंवा प्रशासकीय पातळीवर नेण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने त्वरित हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.