मुख्यमंत्री फडणवीसांचा २८८ मतदारसंघांचा दौरा ठरला; भाजपकडून मनपा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला गती

    14-Jul-2025
Total Views |
 
CM Fadnavis
 (Image Source-Internet)
नागपूर :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकांची घोषणा जवळ आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या असून, राजकीय पक्षांनीही संघटनबांधणीला गती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत मनपा निवडणुकांच्या तयारीचा नारळ फोडला आहे.
 
भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यभर दौरा ठरवला असून, ते थेट २८८ विधानसभा मतदारसंघांत कार्यकर्त्यांच्या भेटीला जाणार आहेत. विकासकामांची पाहणी, संघटनात्मक परिस्थितीचा आढावा आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा भाजपचा मानस आहे. या दौऱ्यासाठी विस्तृत आराखडा तयार असून, तो लवकरच कार्यान्वित होणार आहे.
 
गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर काही कार्यकर्ते निष्क्रिय झाले होते. यामुळे पुन्हा ऊर्जा निर्माण करण्याची गरज पक्षाला भासली. त्यातच लोकसभा निवडणुकीतील अपेक्षेप्रमाणे निकाल न मिळाल्याने संघटन थोडंसं खचलं होतं. हीच पोकळी भरून काढण्यासाठी आणि आगामी निवडणुकांना भिडण्यासाठी भाजपने नव्या जोमानं रणनिती आखली आहे.
 
भाजपची निवडणूक तयारी ही इतर पक्षांच्या तुलनेत अधिक योजनाबद्ध आणि आक्रमक असते, ही प्रतिमा कायम राखण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे. दौऱ्याची नेमकी तारीख जरी अद्याप स्पष्ट नसली, तरी सर्व नियोजन पूर्ण असून, मुख्यमंत्री लवकरच या दौऱ्यास सुरुवात करतील, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळत आहे.