'या' बँकेवर बँकेवर RBI चे निर्बंध; सहा महिने रक्कम काढण्यावर बंदी

    10-Jul-2025
Total Views |
 
RBI
(Image Source-Internet)  
मुंबई :
राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्राला मोठा धक्का देणारा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) घेतला आहे. मुंबईत कार्यरत असलेल्या भवानी सहकारी बँकेवर आरबीआयने गंभीर आर्थिक स्थिती लक्षात घेऊन बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 अंतर्गत कडक निर्बंध लावले आहेत.
 
या निर्णयानुसार, ४ जुलै २०२५ पासून पुढील सहा महिन्यांसाठी बँकेच्या कोणत्याही खातेदाराला पैसे काढता येणार नाहीत. मात्र बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नसून, आर्थिक स्थिती सुधारल्यास हे निर्बंध उठवले जाऊ शकतात, अशी स्पष्टता RBI ने दिली आहे.
 
खातेदारांची धावपळ, महिलांचा आक्रोश-
निर्बंध लागू झाल्यानंतर दादर आणि घाटकोपर येथील शाखांमध्ये खातेदारांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. अचानक आर्थिक व्यवहार बंद झाल्याने वैद्यकीय, शिक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी पैसे आवश्यक असलेल्या ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
 
विशेषतः महिलांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, 'लाडकी बहीण' योजनेतील निधी अडकला आहे, अशी तक्रार अनेकांनी केली. एका महिला खातेदाराने सांगितले, “फक्त पाच हजार रुपयांची गरज आहे, पण बँकेने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. हे पैसे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.”
 
आरबीआयचा निर्णय आणि बँकेला सुधारण्याची संधी-
RBI च्या माहितीनुसार, भवानी सहकारी बँकेला यापूर्वीही वेळोवेळी आर्थिक शिस्त आणि सुधारणा बाबत सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र त्या अंमलात न आणल्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली.
 
बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर, पुर्नबांधणी योजनेवर आणि व्यवस्थापनावर आरबीआयचे बारकाईने निरीक्षण सुरू असून, परिस्थिती सुधारल्यास निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवले जाऊ शकतात.
 
दरम्यान, खातेदारांनी घाबरून जाऊ नये आणि अधिकृत माहितीचीच शहानिशा करावी, असे आवाहन आरबीआयने केले आहे.