शेतकऱ्यांवरील वक्तव्यांचा निषेध; मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी,विरोधकांचा विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार

01 Jul 2025 16:10:25
 
opposition boycotts
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस शेतकरी प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर गाजला. सत्ताधाऱ्यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्यांचा निषेध नोंदवत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अशी ठाम मागणी विरोधकांनी केली.
 
गेल्या काही महिन्यांत राज्यभरात शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. याच दरम्यान भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी ‘शेतकरी आमच्या पैशावर जगतात’ असे वादग्रस्त विधान केल्याने संतापाचा भडका उडाला. कृषिमंत्र्यांचेही काही वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विरोधकांनी या विधानांचा निषेध करत सभागृहात सरकारवर जोरदार टीका केली.
 
सभागृहात गोंधळ, घोषणाबाजी आणि नाना पटोलेंचे निलंबन-
शेतकरीविषयक विधानांचा निषेध करत काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन आंदोलन करू लागले. त्यानंतर सभागृहात “मुख्यमंत्री माफी मागा” अशा घोषणा देत वातावरण ढवळून निघाले. गोंधळामुळे काही काळ कामकाज स्थगित करण्यात आले. मात्र पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही घोषणाबाजी कायम राहिल्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
 
सरकार शेतकऱ्यांविरोधात बोलणाऱ्यांना पाठीशी घालतंय?
राज्यात शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात बारा जिल्ह्यांत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असतानाच, सत्ताधारी नेत्यांची विधानं शेतकऱ्यांच्या भावना दुखावणारी आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. "शेतकऱ्यांविरोधी बोलणाऱ्यांवर सरकार काहीच कारवाई करत नाही, म्हणजेच त्यांना पाठिंबा दिला जातो का?" असा थेट सवाल त्यांनी केला.
 
आवाज दाबण्याचा प्रयत्न; पण आम्ही माघार घेणार नाही –
"शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही आवाज उठवत राहू. गरज पडल्यास रस्त्यावर उतरू, तुरुंगात जावं लागलं तरीही मागे हटणार नाही," असं ठाम मत विजय वडेट्टीवार यांनी मांडलं. आमच्या बोलण्यावर सभागृहात मर्यादा घातल्या जात आहेत, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला आणि दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार जाहीर केला.
Powered By Sangraha 9.0