(Image Source-Internet)
मुंबई :
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार आवाज उठवत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला आणि अध्यक्षांनी त्यांना एका दिवसासाठी निलंबित केलं.
नाना पटोले यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, “राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत नाही. बियाण्यांचे वाढते दर, हमीभावाचा अभाव, या सगळ्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. भाजप आमदार जर म्हणत असतील की मोदी शेतकऱ्यांचे ‘बाप’ आहेत, तर तो त्यांचा प्रश्न आहे. आमचा नाही.”
या विधानावरून भाजप आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. सभागृहात आवाज उठला, वातावरण तापलं. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोलेंनी वापरलेली भाषा असंसदीय असल्याचं सांगत त्यांचं वर्तन अनुचित असल्याचं नमूद केलं. तरीही पटोले आपल्या मतावर ठाम राहिले आणि अध्यक्षांच्या आसनापर्यंत जात आक्रमकपणे बोलत राहिले.
या पार्श्वभूमीवर, सभागृहात शिस्त राखण्यासाठी अध्यक्षांनी नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
सभागृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना पटोले म्हणाले, “शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही कुणाच्याही दबावाला भीक घालणार नाही. शेतकऱ्यांच्या बाजूने आमचा लढा सुरू राहील.”
त्यांच्या विधानावरून झालेला वाद, त्यांचं आक्रमक वर्तन आणि त्यानंतर झालेलं निलंबन या सगळ्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वातावरण तापलेलं पाहायला मिळालं.