नागपुरातील उद्योजकांना आता कोराडी आणि खापरखेड़ा औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख मोफत मिळणार!

01 Jul 2025 20:03:44
 
Koradi and Khaparkheda
 (Image Source-Internet)
नागपूर :
कोराडी (Koradi) औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या राखविषयक वापराबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत कोराडी आणि खापरखेड़ा प्रकल्पांतून निर्माण होणारी कोळशाची राख आता सर्व उद्योजकांना मोफत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
 
जिल्हाधिकारी इटनकर यांनी सांगितले की, कोळशाची ही राख खसरा, कोराडी, वारेगाव आणि नांदगाव येथील राखबांधांपर्यंत नेण्यात येते. ही राख ईंट उद्योगासह इतर भरावासाठी उपयुक्त असून, तिचा प्रभावी आणि पर्यावरणपूरक वापर शक्य आहे. सरकारकडून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
 
कोराडी प्रकल्पातून दररोज १२ हजार मेट्रिक टन तर खापरखेड़ा प्रकल्पातून ७ हजार मेट्रिक टन राख निर्माण होते. या राखेचा उपयोग शासकीय व निमशासकीय कार्यालयांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध विकासकामांसाठी होणार आहे. यासाठी प्रति टन फक्त १२५ रुपये वाहतूक खर्च संबंधित कार्यालयांना देण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
 
या उपक्रमाअंतर्गत राख नागपूर आणि आसपासच्या राख आधारित उद्योगांना, दगड खाणींना, ले-आऊट फिलिंग प्रकल्पांना, बांधकाम व्यावसायिकांना, तसेच लघु उद्योगांना – जसे की वीटभट्टी, सिमेंट पाइप, पेव्हर ब्लॉक उद्योग – मोफत दिली जाणार आहे.
 
ही राख बांधकाम व पर्यावरण विभागाच्या नियमांनुसार आणि अटी-शर्तींनुसार वितरित केली जाणार आहे. सध्या कोराडी, खसरा व वारेगाव राखबांधांमध्ये प्रचंड प्रमाणात राख उपलब्ध असून, तिच्या कार्यक्षम वापरासाठी औष्णिक प्रकल्प आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून विशेष योजना राबवण्यात येत आहेत.
Powered By Sangraha 9.0