(Image Source-Internet)
मुंबई :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) पक्षाला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी आमदार कुणाल पाटील हे आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये इनिंग सुरू-
धुळे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते – ज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती आणि ग्रामपंचायतीतील लोकप्रतिनिधींचा समावेश आहे – हे सर्व मुंबईकडे रवाना झाले असून, आज कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पाटील यांनी काँग्रेस नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमात एकाही काँग्रेस नेत्याचा फोटो झळकलेला नव्हता, यावरूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं.
उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढणार-
धुळे जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रात कुणाल पाटील यांचा मजबूत जनाधार आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षांतरामुळे भाजप व महायुतीला या भागात अधिक मजबुती मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. काँग्रेससाठी मात्र ही एक मोठी धोक्याची घंटा ठरणार आहे.
काँग्रेसमध्ये वाढती अस्थिरता, आघाडीसमोरील संकट गहिरे-
लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणात यश मिळवूनही काँग्रेसला विधानसभेच्या राजकारणात अपेक्षित ताकद मिळवता आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अनेक नेते एकतर भाजपात किंवा शिंदे गटात प्रवेश करत आहेत. कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय ही काँग्रेससाठी आतापर्यंतची सर्वात मोठी गळती मानली जात आहे.
थोडक्यात सांगायचं झालं, तर काँग्रेसमधील नाराजगट वाढत चाललेला असून, येणाऱ्या स्थानिक निवडणुकांआधी पक्षाला संघटनात्मक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.