धन-संपत्ती निर्माण करणारी माती हेच खरे शक्तिपीठ; बच्चू कडूंचा शक्तिपीठ हायवेवरून राज्य सरकारवर हल्लाबोल

    01-Jul-2025
Total Views |
 
Bachchu Kadu
 (Image Source-Internet)
नागपूर :
राज्य सरकारच्या शक्तिपीठ हायवे प्रकल्पाविरोधात राज्यभरातून तीव्र विरोध होत असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “शेतकऱ्यांची जमीन म्हणजेच खरी शक्तिपीठ आहे,” असा पुनरुच्चार करत त्यांनी हायवे प्रकल्पाच्या विरोधात जनआंदोलन उभं करण्याचा इशारा दिला.
 
बच्चू कडू म्हणाले, “मुख्यमंत्री पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जाणार आहेत, देव त्यांना अक्कल देवो आणि तिथून परतताना शेतकऱ्यांना दिलासा देणारी एखादी घोषणा घेऊनच यावं.” त्यांनी सरकारच्या धोरणांवर कडवट टीका करत म्हटलं की, “धन-संपत्ती निर्माण करणारी माती हीच खरी शक्तिपीठ आहे. तिचा नाश करून सरकार विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.”
 
“८५ हजार कोटींचा महामार्ग आम्ही मागितला नव्हता,” असं सांगत त्यांनी सरकारवर हायवे प्रकल्प लोकांवर जबरदस्तीने लादल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत काही खास व्यक्तींच्या फायद्यासाठी हा प्रकल्प रेटून नेला जात असल्याचं ते म्हणाले.
 
“शेतकऱ्यांची जमीन वाचवणं हेच आमचं प्रथम कर्तव्य आहे,” असं ठाम मत व्यक्त करत कडू यांनी सर्व विरोधी संघटनांना पाठिंबा देण्याची घोषणा केली.
 
काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांचं सभागृहातून एक दिवसाचं निलंबन ही भाजपची असहिष्णुता दर्शवते, असं कडू म्हणाले. “इथे लोकशाहीचा गळा दाबला जातोय. भाजप सरकार 'ईडी'चा वापर करून विरोधकांना दडपण्याचं काम करत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
 
३ जुलै रोजी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात बैठक होणार असून, त्यामध्ये महसूलमंत्री बावनकुळे काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. “जर कर्जमाफी झाली नाही, तर भाजपला निवडणुकीत जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल,” असा स्पष्ट इशाराही बच्चू कडूंनी दिला.
 
"शक्तिपीठ हायवेच्या नावाखाली जमिनी हिरावण्याचा प्रयत्न करू नका. शेतकऱ्यांना न्याय द्या, अन्यथा जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही," असा सज्जड इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिला आहे.