मुंब्रा-दिवा रेल्वे मार्गावर भीषण अपघात; लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

09 Jun 2025 14:08:45
 
Mumbra Diva railway line
(Image Source-Internet)
ठाणे :
मध्य रेल्वेच्या मुंब्रा (Mumbra) आणि दिवा स्थानकांदरम्यान सोमवारी (९ जून) सकाळी एक धक्कादायक रेल्वे अपघात घडला. धावत्या लोकलमधून आठ प्रवासी खाली पडले, ज्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात गदारोळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
 
प्रारंभिक माहिती नुसार, सीएसएमटीहून कसाऱ्याकडे येणारी फास्ट लोकल आणि कसाऱ्यावरून सीएसएमटीकडे परत येणारी दुसरी लोकल एकमेकांच्या समोरून जात असताना हा अपघात झाला. त्यावेळी अत्यधिक गर्दी होती. दोन्ही लोकल्स एकमेकांच्या अगदी जवळून जात असताना प्रवासी संतुलन साधू न शकल्याने आठ जण ट्रेनमधून खाली पडले.
 
अपघातात सात पुरुष आणि एक महिला यांचा समावेश आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गर्दी आणि लोकलच्या वेगामुळे प्रवाशांना आपल्या जागेवर ताबा ठेवणे शक्य झाले नाही, आणि त्यामुळे ते ट्रॅकवर पडले.
 
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने मदत पाठवली आणि जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल केले. रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी सांगितले की, “दुर्घटना झाल्यानंतर गार्डने लगेच माहिती दिली, आणि मुंब्रा व दिवा येथून मदतकार्य सुरू करण्यात आले.”
 
अपघातामुळे स्थानिक रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, काही गाड्या उशिराने धावत आहेत. अपघाताची चौकशी रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षा आणि गर्दीच्या तासांतील अतिरिक्त दक्षतेचा मुद्दा समोर आला आहे.
Powered By Sangraha 9.0