सुनीता जामगडे प्रकरणात अडथळा; कारगिल पोलिसांचा प्रोडक्शन वॉरंट अर्ज न्यायालयाने फेटाळला, पुढील आठवड्यात पुन्हा अर्ज

    06-Jun-2025
Total Views |
 
Sunita Jamgade case
 (Image Source-Internet)
नागपूर :
भारत-पाकिस्तान सीमेवरून कारगिल मार्गे पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या सुनीता जामगडे (Sunita Jamgade) प्रकरणात एक नवा वळण आलं आहे. कारगिल पोलिसांनी तिच्याविरोधात विशेष कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून तिला कारगिल येथे तपासासाठी नेण्याचे नियोजन सुरू होते. मात्र, नागपूर न्यायालयाने आवश्यक दस्तऐवज अपूर्ण असल्यामुळे प्रोडक्शन वॉरंट नाकारला आहे.
 
त्यामुळे कारगिल पोलिसांना सुनीता जामगडे हिला न्यायालयीन संमतीविना परतावे लागले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हा अडथळा निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात कारगिल पोलिस नव्याने वॉरंटसाठी अर्ज करणार असून, यावेळी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली जाणार आहेत.
 
सध्या सुनीता जामगडे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायिक कोठडीत असून, तिच्यावर कडक नजर ठेवण्यात येत आहे. नागपूर पोलिस आणि कारगिल पोलिस यांच्यात या प्रकरणाबाबत सतत समन्वय सुरू आहे.
 
नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटनेची शहानिशा करण्यासाठी सुनीता हिला कारगिलमध्ये नेऊन घटनास्थळी ‘घटनेचे पुनर्रचना’ (रिक्रिएशन) करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडली जात आहे.
 
या प्रकरणावर संपूर्ण राज्यातीलच नव्हे तर देशभरातील नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे. पुढील आठवड्यात नागपूर न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.