पैशातून सत्ता, सत्तेतून भ्रष्टाचार; विजय वाडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल

    05-Jun-2025
Total Views |
 
Vijay Wadettiwar
 (Image Source-Internet)
नागपूर :
नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वाडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सत्तेसाठी भाजपने पैशाचा आधार घेतल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी म्हटले की, "भाजपने सत्ता म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे सत्ता हे समीकरण अचूक जमवले आहे."
 
गुरुवारी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना वाडेट्टीवार म्हणाले, "महापालिकेत कितीतरी प्रश्न प्रलंबित आहेत .पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, कचरा व्यवस्थापन मात्र भाजप याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत केवळ पैशाच्या जोरावर सत्तेच्या खुर्चीवर डोळा ठेवून आहे."
 
महापालिकेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. "नागपूरची दयनीय अवस्था, प्रशासनातील अपयश आणि भाजपच्या कार्यकाळातील घोटाळे लवकरच जनतेसमोर मांडले जातील," असं ते म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही या परिस्थितीसाठी जबाबदार धरले.
 
महापालिका निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असेल, यावर वाडेट्टीवार म्हणाले, "काँग्रेस ही राष्ट्रीय स्तरावर काम करणारी पक्ष आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाचे निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार घेतले जातील. भारत आघाडीसंदर्भात जे निर्णय घेण्यात येतील, ते केंद्रीय नेतृत्व ठरवेल."
 
उद्धव ठाकरे यांचे इंडिया आघाडीत स्थान स्पष्ट करत वाडेट्टीवार म्हणाले, "त्यांनी बैठकीला हजेरी लावली आहे, त्यामुळे त्यांचा सहभाग निश्चित आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भवितव्याबाबत मात्र निर्णय पवार साहेबच घेतील. आमच्या मते शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत."
 
जर आघाडी झाली, तर एकत्र लढू; अन्यथा काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल. भाजप आघाडीसंदर्भात जनतेला गोंधळात टाकत आहे. पण आम्ही जनतेच्या प्रश्नांवर, शहराच्या समस्यांवर आणि पारदर्शक कारभारावर भर देणार आहोत,असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत काँग्रेसच्या रणनीतीबाबत त्यांनी स्पष्ट केलं की, निर्णय स्थानिक स्तरावर घेतले जातील आणि तोही जनतेच्या हितासाठी असेल.