नागपूर ते मुंबईदरम्यान समृद्धी महामार्ग पूर्णतः खुला; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

05 Jun 2025 19:05:48
 
CM Fadnavis
 (Image Source-Internet)
मुंबई :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Highway) शेवटचा टप्पा आज अधिकृतपणे प्रवाशांसाठी खुला झाला. यामुळे नागपूरपासून मुंबईपर्यंतचा ७०१ किलोमीटरचा प्रवास आता अवघ्या आठ तासांत शक्य होणार आहे.
 
या ऐतिहासिक घटनेचा समारंभ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७६ किलोमीटर लांबीच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि इतर अनेक महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते.
 
या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी (५२० किमी) या भागासाठी झाले होते. त्यानंतर उर्वरित टप्पे हळूहळू पूर्णत्वास गेले. मात्र शेवटचा टप्पा – इगतपुरी ते आमणे – वाहतुकीसाठी खुला होणे बाकी होता. आता अखेर तो टप्पाही पूर्ण झाल्याने नागपूर ते मुंबई असा संपूर्ण प्रवास एकाच मार्गावरून करता येणार आहे.
 
समृद्धी महामार्ग हा केवळ द्रुतगती मार्ग नसून महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा महत्त्वाचा भाग मानला जातो. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांना मुंबईशी थेट जोडणाऱ्या या महामार्गामुळे औद्योगिक, व्यापारिक आणि शेतीविकासाला मोठी चालना मिळणार आहे.
 
या महामार्गालगत अनेक औद्योगिक टाऊन्स, लॉजिस्टिक हब्स, कृषी प्रक्रिया केंद्रे उभारण्याची योजना आहे. महामार्गाची रचना अशी आहे की तो तीन आंतरराष्ट्रीय आणि सात देशांतर्गत विमानतळांशी, पन्नास बंदरांशी आणि सहा हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वे नेटवर्कशी थेट जोडलेला आहे. त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसह व्यापारासाठीही क्रांतिकारी ठरणार आहे.
 
पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा महामार्ग विशेष मानला जातो. त्यावर ११.५ लाख झाडांची लागवड करण्यात आली असून, हा भारतातील पहिला संपूर्ण पर्यावरणपूरक महामार्ग म्हणून गणला जात आहे. महामार्गावरून प्रति तास १२० किलोमीटरच्या वेगाने सुरक्षित प्रवास करता येतो, हे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
 
समृद्धी महामार्गाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली आणि अखेरचा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेला. त्यामुळे अनेकांनी फडणवीसांना या प्रकल्पाचा ‘फिनिशर’ असे गौरवाचे नाव दिले आहे.
 
नागपूर ते मुंबई असा प्रवास आता जलद, सुरक्षित आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांमधून होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास अधिक वेगाने घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0