पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील निवासस्थानी पर्यावरण दिनी सिंदूर झाडाचे लावले रोप!

    05-Jun-2025
Total Views |
 
PM Narendra Modi
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (५ जून) आपल्या नवी दिल्लीतील निवासस्थानी सिंदूर या पवित्र वनस्पतीचे रोप लावले. हे रोप त्यांना अलीकडील गुजरात दौर्‍यात १९७१ च्या भारत-पाक युद्धातील वीर महिलांनी भेट दिले होते. मोदींनी या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत वीरांगनांबद्दल आदर व्यक्त केला.
 
ते म्हणाले, “कच्छच्या शूर माता-बहिणींनी दिलेले सिंदूर आज माझ्या निवासस्थानी लावण्याचा योग आला. हे रोप भारतीय स्त्रीशक्तीच्या साहसाचे आणि प्रेरणेचे प्रतीक राहील.”
 
या रोपाचे ‘ऑपरेशन सिंदूर’शी देखील संबंध जोडले जात आहेत. ७ मे रोजी भारताने पीओके आणि पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून सुमारे १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे प्रतिहल्ले २२ एप्रिल रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आले होते. या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले आहे.
 
सिंदूर वनस्पतीचे महत्त्व-
सिंदूर ही धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र मानली जाणारी वनस्पती आहे. तिचे पान आणि वृक्ष शुभतेचे व शक्तीचे प्रतीक मानले जातात. मंदिरे, घरामध्ये ही झाडे लावली जातात आणि त्याची देखभाल करणे सोपे असते. पर्यावरणदृष्ट्या देखील ही वनस्पती उपयुक्त आहे.
 
जागतिक पर्यावरण दिनाविषयी-
५ जून रोजी पर्यावरण दिन जगभरात निसर्ग व पर्यावरण रक्षणासाठी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी या दिनाची सुरुवात केली. दरवर्षी नवीन संकल्पनेवर आधारित कार्यक्रम राबवले जातात, जे लोकांना पर्यावरणपूरक पावले उचलण्यास प्रेरणा देतात.