छत्तीसगड पोलिसांना मोठे यश; दहशत निर्माण करणारा नक्षलवादी नेते नरसिंहाचलम नायडू चकमकीत ठार

    05-Jun-2025
Total Views |
 
Chhattisgarh police
 (Image Source-Internet)
गडचिरोली :
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. तो नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता आणि त्याच्यावर तीन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
 
५ जून रोजी छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील इंद्रावती नॅशनल पार्कच्या परिसरात सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. गुप्त माहितीच्या आधारे छत्तीसगड पोलिसांच्या डीआरजी (District Reserve Guard) आणि एसटीएफ (Special Task Force) पथकांनी संयुक्त कारवाई राबवली. सुमारे एक हजार जवानांनी या जंगल भागात मोठा नक्षलविरोधी मोहिम राबवला.
 
या कारवाईत नरसिंहाचलम नायडू जागीच ठार झाला. तेलंगणा राज्य समितीचे सदस्य बंदी प्रकाश आणि दंडकारण्य झोनल विशेष समितीचे सदस्य पापा राव यांच्यासह अनेक नक्षलवादी घटनास्थळावर उपस्थित असल्याची माहिती आहे, मात्र ते जंगलात पसार झाले.
 
सुधाकर हा महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा आणि झारखंड या राज्यांमध्ये 'मोस्ट वाँटेड' होता. या चकमकीत दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. त्यामुळे आणखी काही नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
 
ही कारवाई नक्षल चळवळीवर मोठा आघात मानली जात असून, पोलिस दलाच्या नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.