(Image Source-Internet)
मुंबई :
मुंबईतील चर्चगेट (Churchgate) रेल्वे स्थानकावर आज सकाळच्या वेळेत आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. स्थानकातील तिकीट काऊंटरपासून पुढे असलेल्या खाद्यपदार्थांच्या दुकानांच्या भागात ही आग लागली असून संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पाहायला मिळाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण पसरले.
सुरुवातीच्या माहितीनुसार, एका दुकानामध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग भडकली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेनंतर काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, धुरामुळे स्टेशन परिसरात अंधुकता पसरली आणि प्रवासी धावपळ करताना दिसले. सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थानकाचा काही भाग रिकामा करण्यात आला आहे.
पोलीस व आपत्कालीन सेवा तत्काळ पोहोचल्या असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचं आणि कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला बळी न पडता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.