‘माझी लाडकी बहीण’ योजनेत मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू; महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा

    05-Jun-2025
Total Views |
 
Majhi Ladki Baheen scheme
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Majhi Ladki Baheen scheme) या योजनेअंतर्गत मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होऊ लागला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, सोशल मीडियावर याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.
 
महिलांना या योजनेतून दरमहा 1500 रुपये दिले जातात. एप्रिल महिन्याचा हप्ता 7 मे रोजी देण्यात आला होता. त्यानंतर महिलांना मे महिन्याच्या रकमेची उत्सुकता लागून राहिली होती. आता हप्ता जमा होऊ लागल्याने लाभार्थींमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
 
योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 11 हप्त्यांद्वारे एकूण 16,500 रुपये वितरित करण्यात आले आहेत. काही वेळा दोन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्यात आले होते. उदाहरणार्थ, फेब्रुवारी व मार्च महिन्याचा निधी एकत्रित जमा करण्यात आला होता.
 
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की,लाखो महिलांचा आत्मविश्वास आणि महायुती सरकारचा ठाम निर्णय या दोन्हींच्या जोरावर ही योजना यशस्वीपणे पुढे नेली जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण प्रशासन यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
 
दरम्यान, सर्व महिलांना 1500 रुपये मिळत नसून काही महिलांना केवळ 500 रुपये मिळतात. या महिला पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत असल्यामुळे, त्यांना या योजनेतून संपूर्ण रक्कम न देता 500 रुपयांचं अनुदान दिलं जातं.