(Image Source-Internet)
नागपूर:
राज्यात कोरोना (Corona) संसर्गाचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मंगळवारी २४ तासांमध्ये ८६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे, ज्यांच्या मृत्यूला इतर गंभीर आजारही कारणीभूत ठरले आहेत.
नागपूरमध्ये मृत्यू झालेल्या दोन रुग्णांपैकी एकजण HIV व क्षयरोगाने पीडित होता, तर दुसऱ्या रुग्णास मूत्रपिंडाचे विकार होते. सध्या नागपूरमध्ये एकूण १७ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी ११ रुग्णांनी संसर्गावर यशस्वी मात केली आहे. उर्वरित चार जणांवर उपचार सुरू आहेत.
राज्यभरातील आकडेवारीनुसार, सध्या महाराष्ट्रात ५९० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मंगळवारी ४३५ रुग्णांनी कोरोनामुक्त होऊन घरी परतले. मात्र, वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने जनतेला अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, नाशिकमधूनही कोरोनाबाधिताची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टरांनी त्यांना घरातच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्थिती पाहता, तेथे ८ कोरोनाबाधित रुग्ण नोंदले गेले आहेत. यामध्ये सात रुग्ण महापालिका क्षेत्रातील असून, एक रुग्ण ग्रामीण भागातील आहे. विशेष म्हणजे हा रुग्ण सध्या शहरात वास्तव्यास आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईतील कामा रुग्णालयात कोरोनाच्या वाढत्या संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. महिला व बालकांसाठी समर्पित असलेल्या या रुग्णालयात ३० खाटांचे कोरोना उपचार युनिट कार्यान्वित करण्यात आले असून, तेथे प्रगत वैद्यकीय सुविधा, प्राणवायू पुरवठा आणि निगराणी प्रणाली उभारण्यात आली आहे.
देशभरातही संसर्गाचे प्रमाण वाढत असून सध्या देशात ४,०२६ अॅक्टिव्ह रुग्ण नोंदले गेले आहेत. महाराष्ट्रातील सध्याची आकडेवारी ५१० वर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे प्रशासनाचे आवाहन आहे.