(Image Source-Internet)
नागपूर :
नागपूर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत नागपूर महानगरपालिकेने वाठोडा परिसरात आधुनिक श्वान आश्रय (Modern dog shelter) केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ६ कोटी ८९ लाख ६७ हजार २८१ रुपयांचा खर्च मान्य करण्यात आला आहे.
वर्तमानात अस्तित्वात असलेल्या आश्रयस्थळातील सुविधांचा अभाव लक्षात घेता, नागपूरचे नगर आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशावरून नव्या केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. अंदाजे तीन एकर जागेत हे अत्याधुनिक केंद्र उभारले जाईल आणि सुमारे दोनशे कुत्र्यांच्या देखभालीची क्षमता यात असेल.
या नव्या प्रकल्पात प्राणी कल्याणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरवण्यात येणार असून, श्वानांच्या आरोग्याची, स्वच्छतेची आणि देखभालीची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे आर्किटेक्चरल डिझाईन श्रीपद दुबे यांनी तयार केले असून, एक्सिनो कॅपिटल सर्व्हिसेस आणि श्रीपद दुबे आर्किटेक्ट्स यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे.
शहरातील रस्त्यांवर भटकणाऱ्या प्राण्यांना सुरक्षित व आरोग्यपूर्ण आश्रय उपलब्ध करून देण्यासाठी मनपाने उचललेले हे पाऊल पशुसंवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता मिळाल्याने आता लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.