(Image Source-Internet)
मुंबई :
आझाद मैदानावरील भाषणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर तीव्र शब्दांत टीका करत जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवला आहे. हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता त्यांनी या नव्या विधेयकाला टार्गेट करत भाजप सरकारचा हेतू संशयास्पद असल्याचं स्पष्ट केलं.
“भाजपला असं वाटतं की जो कोणी त्यांच्याविरोधात बोलेल तो देशद्रोही ठरतो. स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचा काही संबंध नव्हता, ते आज देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटत आहेत,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. लोकसभा निवडणुकीत ४०० जागांचा दावा करणाऱ्या भाजपला महाराष्ट्रात आपण रोखल्याचा दावा करत त्यांनी विधानसभेतील अनपेक्षित राजकीय उलथापालथीवरही सवाल उपस्थित केला.
ठाकरे यांनी आपल्या भाषणात २०१७-१८ मध्ये हजारो शेतकऱ्यांनी मुंबईकडे काढलेल्या मोर्चाचा दाखला देत त्यांच्यावर नक्षलवादी ठपका ठेवण्याची भाजपने केलेली चूकही लक्षात आणून दिली. “गोरगरीब शेतकरी अनवाणी चालत येतोय, त्याच्या पायातून रक्त वाहतंय – तो नक्षलवादी कसा? आमचं नातं त्याच्याशी रक्ताचं आहे,” असं ते म्हणाले.
'जनसुरक्षा विधेयक' म्हणजे राजकीय विरोधकांना टार्गेट करण्याचा डाव –
ठाकरे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर सादर करण्यात येत असलेल्या जनसुरक्षा विधेयकावर शंका उपस्थित करत म्हटलं, “हे विधेयक राजकीय विरोधकांना अटक करण्यासाठी आणलं जातंय. अतिरेकी गेले कुठे? भाजपमध्ये गेले का? भाजपमध्ये गेल्यावर सगळं माफ का होतं?” असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला.
सभागृहात त्यांचं बहुमत, पण रस्त्यावर आमची ताकद-
सरकारकडे संख्याबळाचं बळ असलं, तरी जनतेच्या पाठबळावर आमची सत्ता रस्त्यावर असल्याचं ठाकरे म्हणाले. “हिंदी सक्तीवर आम्ही मागे हटलो नाही. महाराष्ट्रभर जीआरची होळी केली. आता हे विधेयक आणून विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केलात, तर त्याला कडाडून विरोध केला जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यांमुळे 'जनसुरक्षा विधेयक'ावरून आगामी अधिवेशनात मोठा राजकीय संघर्ष होण्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत.