ठाकरे बंधूंच्या एकतेमुळे सरकारचं माघारी पाऊल;संजय राऊतांचा दावा

30 Jun 2025 12:16:12
 
Sanjay Raut
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्य सरकारने त्रिभाषा धोरणासंबंधी घेतलेला निर्णय अखेर मागे घेतला असून, यामागचं मुख्य कारण म्हणजे ठाकरे बंधूंची वाढती एकता आणि मराठी जनतेचा वाढता रोष, असं प्रतिपादन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
 
“राज ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा करताच काही मिनिटांत उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा जाहीर केला. दोघेही एकत्र येणार हे लक्षात येताच सरकार गडबडून गेलं आणि निर्णय मागे घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही,” असं राऊत म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, “ही लढाई फक्त त्रिभाषा धोरणापुरती मर्यादित नाही. ही सुरुवात आहे. मराठीचा आवाज उठवण्यासाठी ठाकरे बंधू भविष्यातही खांद्याला खांदा लावून उभे राहतील. सरकारने हे पाऊल मराठी भावनेच्या आदरापोटी नाही, तर राजकीय दबावामुळे उचललं आहे.”
 
राजकीय एकत्र येण्यावरून राऊतांनी भाजपवरही टीका केली. “फडणवीस आणि शिंदे, फडणवीस आणि अजित पवार एकत्र येतात, तेव्हा चालतं. पण राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले की तुम्हाला त्रास होतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
भाजपकडून त्रिभाषा सूत्राचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या काळात झाल्याचा दावा सतत केला जातो. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “हा आरोपच खोटा आहे. जर अहवाल होता, तर तो सादर करा. केवळ खोटं बोलून जनतेला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करू नका.”
 
राऊतांनी ५ जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. “राज आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणारा हा मोर्चा म्हणजे मराठी अस्मितेचं प्रतीक आहे. या मोर्चामुळे जनआंदोलन उभं राहिलं असतं, म्हणूनच सरकारने मागे फिरण्याचा निर्णय घेतला,” असं त्यांनी सांगितलं.
 
“हा लढा इथेच थांबणार नाही. मराठी हक्कांसाठीची ही एकजूट सरकारला वारंवार झुकवेल,” अशा शब्दांत संजय राऊतांनी सरकारला इशारा दिला.
Powered By Sangraha 9.0