(Image Source-Internet)
मुंबई:
भाजपला (BJP) लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. या पदासाठी रविंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर प्रमुख भाजप नेते उपस्थित होते. उद्या संध्याकाळी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांची माहिती-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात बोलताना सांगितले, "राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निवडणूक सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यासमोर रविंद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल केला आहे. चव्हाण यांनी युवा मोर्चा कार्यकर्त्या म्हणून सुरुवात केली आणि त्यानंतर नगरसेवक, आमदार होऊन आता प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे." फडणवीसांनी आणखी सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून उत्तम काम केले आणि संघटना मजबूत केली, ज्याचा विधानसभा निवडणुकीत सकारात्मक परिणाम दिसून आला.
रविंद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास-
रविंद्र चव्हाण हे २००७ मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर, २००९ मध्ये भाजपने त्यांना विधानसभेचे उमेदवार म्हणून निवडले, आणि त्यांनी पहिल्यांदा विधानसभेत शिरकाव केला. २०१४ मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडले गेले. त्यानंतर २०१५-१६ मध्ये भाजपने महाराष्ट्रातील विविध महापालिकांमध्ये प्रभाव निर्माण केला, ज्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले. त्यांनी रायगड आणि पालघर जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देखील सांभाळले.
मंत्रीपद आणि शिंदे सरकारला मोलाचा वाटा-
२०१९ मध्ये, चव्हाण तिसऱ्यांदा आमदार झाले. त्यांनी 2021 मध्ये शिंदे सरकार स्थापनेसाठी मोलाचा वाटा उचलला आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्री म्हणून पीडब्ल्यूडी खाते देखील सांभाळले. त्यानंतर सिंधूदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी कारभार केला. 2024 मध्ये ते चौथ्या वेळेस डोंबिवलीतून आमदार निवडून आले आणि आता महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष होण्याच्या दिशेने एक मोठा पाऊल टाकत आहेत.