मोर्चा ऐवजी ५ जुलैला 'विजयी मेळावा' होणार; राज ठाकरेंची घोषणा

    30-Jun-2025
Total Views |
 
Raj Thackeray Victory rally
 (Image Source-Internet)
मुंबई :
मराठी भाषेवर लादल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात जनतेने उभारलेल्या आंदोलनानंतर अखेर राज्य सरकारने माघार घेतली आहे. त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही शासकीय आदेश रद्द करण्यात आले असून, त्याची घोषणा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ५ जुलै रोजी निघणारा मोर्चा आता रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी विजयी मेळाव्याचं आयोजन होणार आहे.
 
या निर्णयामुळे महाराष्ट्रभर संतोष व्यक्त होत असताना, राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की हा मेळावा कोणत्याही राजकीय पक्षाच्या नावाने नसेल. तो मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि एकतेचा सन्मान म्हणून घेतला जाणार आहे. त्यांनी सांगितले की, संजय राऊत यांच्याशी संवादानंतर त्यांनी मोर्चा रद्द करण्याचा आणि मेळावा घेण्याचा निर्णय घेतला. याबाबत अंतिम ठिकाण अद्याप निश्चित झाले नसले तरी, तो मेळावा पक्षीय नसून सर्वसामान्य मराठी जनतेचा असेल, हे त्यांनी अधोरेखित केले.
 
राज ठाकरे म्हणाले की, मराठी भाषेविरोधात कोणीही पाऊल उचलले, तर मी स्वतः त्या विरोधात उभा राहीन. महाराष्ट्राच्या अस्मितेवर कुठलीही तडजोड मान्य केली जाणार नाही. सध्या राज्याच्या चारही दिशांनी विविध स्वरूपात दबाव टाकण्याचे प्रकार सुरू आहेत आणि त्यामुळे मराठी माणसाने सजग राहणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी बजावले.
 
दरम्यान, त्रिभाषा धोरणाचा पुनर्विचार करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने नवी समिती स्थापन केली आहे. ही समिती तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर कोणत्या इयत्तेपासून हिंदी शिकवायचे, याबाबत निर्णय होणार आहे.
 
या संपूर्ण घडामोडींमधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे . मराठी भाषेच्या रक्षणासाठी जनतेने घेतलेली एकजूट हीच खऱ्या अर्थाने सरकारच्या निर्णयावर परिणाम करणारी ठरली. ही केवळ एका मुद्द्यावरची लढाई नव्हती, तर भविष्यातील जागरूकतेची नांदी ठरली आहे.