तेलंगणातील फार्मा युनिटमध्ये प्रचंड स्फोट; १० कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, २० जखमी

    30-Jun-2025
Total Views |
 
Massive explosion
 (Image Source-Internet)
संगारेड्डी (तेलंगणा) :
संगारेड्डी जिल्ह्यातील पशामिलाराम औद्योगिक क्षेत्रातील सिगाची इंडस्ट्रीज या औषधनिर्मिती कंपनीत सोमवारी सकाळी अचानक झालेल्या स्फोटात १० कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अणुभट्टी युनिटमध्ये घडलेल्या या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतका तीव्र होता की काही कामगार थेट १०० मीटरपर्यंत फेकले गेले. स्फोटामुळे युनिटचे संपूर्ण रचना उद्ध्वस्त झाली असून, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे रोबोट व आपत्ती व्यवस्थापन दल तात्काळ दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.
 
अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले असून १३ कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्फोटाचे कारण अद्याप निष्पन्न झालेले नसले तरी अणुभट्टीत झालेल्या अचानक रासायनिक अभिक्रियेमुळे हा स्फोट घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
 
१९८९ पासून कार्यरत असलेली सिगाची इंडस्ट्रीज ही कंपनी मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज (MCC) तयार करते, ज्याचा वापर औषधनिर्मिती व सौंदर्यप्रसाधन उद्योगात मोठ्या प्रमाणात होतो. देशात पाच ठिकाणी या कंपनीचे प्रकल्प असून, तिची उत्पादने ६५ हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात.
 
या दुर्घटनेचा आर्थिक परिणामही लगेच जाणवला असून सिगाची इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये जवळपास ९.८९% घसरण झाली आहे. शेअरची किंमत सध्या ४९.७२ रुपयांवर आहे.
 
प्रशासनाकडून घटनास्थळी तपास सुरू असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अधिकृत आकडेवारीची प्रतीक्षा सुरू आहे.