एसटीतून प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा; १ जुलैपासून आगाऊ आरक्षणावर मिळणार १५ टक्के सवलत

30 Jun 2025 15:47:48
 
ST reservations
 (Image Source-Internet)
मुंबई :
एसटी (ST) महामंडळाने राज्यातील प्रवाशांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १ जुलै २०२५ पासून, १५० किलोमीटरहून अधिक अंतराच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकिटाच्या दरात १५ टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत केवळ पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना लागू होईल; सवलतधारक प्रवाशांना याचा लाभ मिळणार नाही.
 
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात घोषणा केली. १ जून रोजी एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त ही योजना जाहीर करण्यात आली होती, आणि आता ती प्रत्यक्षात १ जुलैपासून अंमलात आणली जाणार आहे.
 
ही योजना दिवाळी आणि उन्हाळी गर्दीच्या हंगामांव्यतिरिक्त वर्षभर लागू राहणार आहे. प्रवाशांनी ऑनलाइन अथवा तिकीट खिडकीवरून आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना सवलतीचा लाभ मिळू शकेल. public.msrtcors.com ही एसटीची अधिकृत वेबसाइट आणि MSRTC Bus Reservation हे मोबाईल ॲप यावरूनही तिकीट आरक्षित करता येणार आहे.
 
आषाढी एकादशी आणि गणपती उत्सवासाठी प्रवास करणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. विशेष म्हणजे, पंढरपूरकडे जाणाऱ्या नियमित बसेसवर ही सवलत लागू होईल. मात्र, या काळात चालवण्यात येणाऱ्या जादा बसेससाठी सवलत मिळणार नाही.
 
तसेच, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इ-शिवनेरी बसमधील प्रवाशांनाही ही सवलत लागू आहे. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
 
एसटी महामंडळाने ही योजना लागू करून, प्रवाशांना प्रवासासाठी प्रोत्साहन दिलं असून, गर्दीच्या वेळा वगळता इतर काळातही बसेसचा वापर वाढावा, असा यामागे उद्देश आहे. प्रवाशांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असं आवाहनही परिवहन मंत्र्यांनी केलं आहे.
Powered By Sangraha 9.0