भारताच्या आणखी एका शत्रूचा शेवट; जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा संशयास्पद मृत्यू

    03-Jun-2025
Total Views |
 
Maulana Abdul Aziz
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली:
भारताविरोधी कट्टर कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या जैश-ए-मोहम्मद (Jaish e Mohammed) या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ नेता मौलाना अब्दुल अजीज इसार याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादी नेटवर्कमध्ये खळबळ उडाली आहे.
 
पंजाब प्रांतातील भाक्कर जिल्ह्यातील अशरफवाला येथील रहिवासी असलेला अब्दुल अजीज हा जैशच्या उच्च नेतृत्वातील महत्त्वाचा चेहरा मानला जात होता. भारताविरुद्ध जहर पसरवणे, तरुणांची ब्रेनवॉशिंगद्वारे भरती करणे आणि हल्ल्यांची आखणी हे त्याचे मुख्य काम होते. गेल्या काही काळात त्याने खुलेआम भारताला धमक्या दिल्या होत्या आणि जैशच्या रॅलीतून उघडपणे विष ओतले होते.
 
मृत्यूमागे गूढतेचे सावट-
जरी अधिकृतरित्या सांगितले गेले असले की अजीजचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, तरी मृत्यूची वेळ, ठिकाण आणि जैश व पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी घेतलेली शांतता लक्षात घेता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काही वृत्तांनुसार, बहावलपूरमधील जैश मुख्यालयाजवळील ‘मरकझ’ परिसरात त्याचा मृतदेह सापडला होता. जैशशी संबंधित सोशल मीडिया हँडल्सनी अजीजच्या मृत्यूची आणि त्याच्या अंत्यसंस्काराची पुष्टी केली आहे. बहावलपूरमध्ये त्याला दफन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र मृत्यूच्या नेमक्या कारणावर अजूनही कोणतेही स्पष्ट वक्तव्य आलेले नाही.
 
जैशसाठी मोठा धक्का-
अब्दुल अजीज हा जैशसाठी फक्त एक कमांडर नव्हता, तर तो कट्टर विचारसरणीचा प्रचारक आणि युवकांना भारताविरुद्ध भडकवणारा मुख्य चेहरा होता. त्याचा मृत्यू ही संघटनेच्या स्थानिक पातळीवरील भरती मोहिमेसाठी मोठी धक्का मानली जात आहे.
 
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम?
अलीकडच्या काळात भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी गट हादरले आहेत. अब्दुल अजीजच्या अशा संशयास्पद मृत्यूला त्याच पार्श्वभूमीवर जोडले जात आहे, जरी याची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. भारतासाठी धोका ठरलेल्या आणखी एका चेहऱ्याचा शेवट झाला असला, तरी यामागचे सत्य काय आहे, हे अद्याप धूसरच आहे.