पाकिस्तानात थरकाप उडवणारी घटना: भूकंपाचा गैरफायदा घेत २१६ कैदी तुरुंगातून पसार

    03-Jun-2025
Total Views |
 
Pakistan Prisoners escape
 (Image Source-Internet)
कराची:
सोमवारी रात्री उशिरा आलेल्या सौम्य भूकंपामुळे (Earthquake) संपूर्ण पाकिस्तान हादरला, मात्र सर्वात मोठा परिणाम झाला तो कराचीच्या मालीर जिल्हा कारागृहात. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवताच तुरुंगात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अनेक कैदी आधीच त्यांच्या बॅरेकबाहेर होते आणि गोंधळाचा फायदा घेत तब्बल २१६ कैद्यांनी तुरुंगातून पलायन केलं.
 
या अचानक घडलेल्या प्रकारामुळे तुरुंग प्रशासनाची झोप उडाली. झटापटी आणि अफरातफरी सुरू झाली. प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करताना गोळीबार केला, ज्यात एका कैद्याचा मृत्यू झाला आणि पाच तुरुंग अधिकारी जखमी झाले. यानंतर पोलीस आणि पाकिस्तानी रेंजर्स तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारागृह आणि त्याच्या आसपासचा संपूर्ण परिसर ताब्यात घेतला.
 
तुरुंगातून पळून गेलेल्या कैद्यांपैकी ८० कैद्यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. उर्वरित फरार कैद्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक सर्च ऑपरेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग आणि अनेक प्रमुख मार्ग बंद करण्यात आले आहेत. तसेच परिसरातील गावं आणि वस्त्या सील करण्यात आल्या आहेत.
 
लोकांनी पळून गेलेल्या कैद्यांविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळवावी, असे आवाहन मशिदींच्या भोंग्यांवरून करण्यात येत आहे. ही घटना केवळ भूकंपामुळे निर्माण झालेल्या भीतीचं द्योतक नसून, तुरुंग व्यवस्थापनातील सुरक्षेच्या त्रुटींचंही गंभीर उदाहरण ठरत आहे.