आता मोबाइलद्वारे करता येणार मतदान; बिहार देशातील पहिलं राज्य ठरलं

    28-Jun-2025
Total Views |
 
voting through mobile
(Image Source-Internet)  
पाटणा :
भारतात पहिल्यांदाच मोबाइल ॲपच्या माध्यमातून कुठूनही मतदान करण्याची सुविधा सुरू झाली असून, बिहार (Bihar) हे या नव्या उपक्रमात पुढाकार घेणारे पहिले राज्य ठरले आहे. राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी शुक्रवारी संध्याकाळी ही महत्त्वाची घोषणा केली.
 
शनिवारी पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारण जिल्ह्यांतील सहा नगर परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे. या वेळी काही खास मतदारांना घरबसल्या मतदानाची संधी मिळणार आहे.
 
दीपक प्रसाद यांच्या माहितीनुसार, ज्या मतदारांना वैयक्तिकरीत्या मतदान केंद्रावर पोहोचणे शक्य नाही – जसे की ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, गरोदर महिला आणि स्थलांतरित मतदार – अशांना ई-मतदानाची सुविधा देण्यात आली आहे.
 
या सुविधेसाठी ‘e-SECBHR’ नावाचे ॲप वापरावे लागेल, जे सध्या केवळ अँड्रॉइड युजर्ससाठीच उपलब्ध आहे. मतदारांनी त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर हे ॲप डाउनलोड करून लिंक करणे गरजेचे आहे. हे ॲप सी-डॅक या तंत्रज्ञान संस्थेने तयार केले असून, राज्य निवडणूक आयोगाने देखील आपले स्वतंत्र ॲप विकसित केले आहे.
 
ई-मतदान कसे करावे?
एका मोबाइल नंबरवरून दोन नोंदणीकृत मतदार लॉगिन करू शकतात
मतदार ओळख पडताळणी केल्यानंतरच मतदानाची प्रक्रिया पूर्ण होते
ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरूनही मतदानाची सुविधा मिळणार आहे
हा उपक्रम यशस्वी ठरल्यास, भविष्यात देशभरात अशाच पद्धतीने मतदानाची संधी मिळू शकते, असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे.