ठाकरे एकत्र आले तरी महापौर उत्तर भारतीयच; उत्तर भारतीय विकास सेनेचा ठाम दावा

28 Jun 2025 18:01:37
 
North Indian Vikas Sena
 (Image Source-Internet)
मुंबई :
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या मोर्च्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच, उत्तर भारतीय विकास सेनेने (North Indian Vikas Sena) मोठा दावा करत राजकीय वातावरण तापवलं आहे. "राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी महापौर उत्तर भारतीयच होणार," असा निर्धार सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी व्यक्त केला आहे.
 
५ जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यावर प्रतिक्रिया देताना शुक्ला म्हणाले, “कोणी कितीही कार्यक्रम घेऊ दे, उत्तर भारतीय समाज आता सजग झाला आहे. यावेळी आमचाच उमेदवार निवडून येईल.”
 
एकजुटीतून सत्ता - आकडेवारीचा आधार
शुक्ला यांनी याआधीही दावा केला होता की, “मुंबईच्या सुमारे २.२० कोटी लोकसंख्येपैकी १ कोटी उत्तर भारतीय आहेत. जर या समाजाने फक्त ३०% मतांची एकजूट केली, तरी आम्ही महापौरपदावर विजय मिळवू शकतो.” त्यांच्या मते, मराठी मतदार हे अनेक पक्षांत विखुरलेले आहेत, त्यामुळे संघटित मतांचा प्रभाव अधिक ठरेल.
 
मराठी अस्मितेवरून राजकीय शाब्दिक चकमक-
ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला असला तरी, भाजपकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, “मी आणि आशिष शेलार दोघंही मराठी आहोत. मग आम्ही कोणते पंजाबी? मराठी मतदार कुणाच्याही ताब्यात नाही. आमच्या कामगिरीवर लोकांनी विश्वास ठेवला.”
 
महापालिका निवडणुकीकडे लक्ष-
५ जुलैचा मोर्चा, उत्तर भारतीय सेनेचा संघटीत प्रयत्न, आणि भाजपचा कामगिरीवर भर या तिघांच्या राजकीय त्रिकोणात मुंबई महापालिका निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत आहेत. मराठी अस्मिता, हिंदी सक्ती आणि उत्तर भारतीय समाजाचे मत हे सर्व मिळून आगामी निवडणुकीचं चित्र अधिकच रंगतदार बनवणार, यात शंका नाही.
Powered By Sangraha 9.0