नागपूरच्या कोतवाली परिसरात बी-पार्क प्रकल्पाअंतर्गत खोदकामादरम्यान मोठा अपघात; पाइल घसरून तिघेजण जखमी

    28-Jun-2025
Total Views |
- सुरक्षिततेसाठी परिसरातील इमारती रिकाम्या करण्याचे आदेश

B Park project(Image Source-Internet)  
नागपूर :
कोतवाली (Kotwali) परिसरातील बुधवार बाजारजवळ बी-पार्क प्रकल्पाच्या बांधकामस्थळी शनिवारी सकाळी मोठा अपघात घडला. नागपूर महापालिकेच्या बी-पार्क प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या खोदकामादरम्यान पाइल अचानक घसरून दोन पोकलेन मशीनवर कोसळली. या घटनेत तीन कामगार जखमी झाले असून, प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
 
जखमी कामगारांची ओळख अजित परमानिक, मनीष नागेश्वर आणि चिंटू कुमार अशी झाली आहे. तिघांनाही तातडीने १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने मेयो रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
 
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ स्थापत्य अभियंता सुनील काठे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. "मलब्यात कुणीही अडकलं नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. घटनेच्या ठिकाणालगत असलेली जुनी व कमकुवत इमारत — चावला स्टोअर्स - चंदना इंटरप्रायझेस — तातडीने रिकामी करण्यात आली असून, मालकाला खबरदारीचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
सुरक्षेच्या दृष्टीने आजूबाजूच्या इमारतीही एहतियात म्हणून रिकाम्या करण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात पाइल अचानक घसरल्याने अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून, याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे.
 
दरम्यान, महापालिकेच्या या प्रकल्पाचे काम वीआयपीएल या कंत्राटदार संस्थेकडून सुरू असून, प्रशासनाने सर्व बांधकाम प्रकल्पांच्या सुरक्षाव्यवस्थांची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.