(Image Source-Internet)
भंडारा :
राज्यभरात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी (School ID scam) आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातून गुरुवारी करण्यात आलेल्या या अटकेमुळे प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
या तिघांना, यापूर्वी अटक करण्यात आलेल्या बनावट शिक्षक महेंद्र महेशकर यांच्या घरी सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महेशकरकडून सापडलेले फर्जी दस्तऐवज हे विविध शाळांतील शिक्षण सचिव, संस्था चालक आणि शिक्षकांच्या नियुक्तीशी संबंधित आहेत.
पोलिस सूत्रांनुसार, या प्रकरणात भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील विनोद हायस्कूल संदर्भातील फसवणुकीचे पुरावे मिळाले. त्याअनुषंगाने शाळेचे मुख्याध्यापक चेतक डोंगरे, माजी सचिव गंगाधर डोंगरे आणि शिक्षक सदानंद कोठीराम जांगडे यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीदरम्यान तिघांना अटक करण्यात आली.
या तिघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
या घोटाळ्यात आतापर्यंत चार माजी शिक्षण उपसंचालक, आठ कर्मचारी आणि चार शाळा चालकांसह एकूण १८ जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु असून आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.