पुरीची रथयात्रा: भक्ती, परंपरा आणि पौराणिक कथांचा मिलाफ

    27-Jun-2025
Total Views |
 
Puri Rath Yatra
 (Image Source-Internet)
पुरी (ओडिशा) :
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.
 
सुभद्रेला पुरी पाहायचं होतं…
श्रीमद्भागवत आणि इतर पुराणांमध्ये वर्णन आहे की, भगवान श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिला एकदा पुरी नगरीचं दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली. तिची ही इच्छा ओळखून श्रीकृष्ण (जगन्नाथ) आणि बलराम (बलभद्र) यांनी तिला रथावर बसवून पुरीच्या दर्शनासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
 
तिघंही रथात बसून नगरभ्रमणासाठी निघाले आणि काही अंतरावर असलेल्या त्यांच्या मौसीच्या गुंडिचा मंदिरात काही दिवस विश्रांतीसाठी थांबले. हेच क्षण रथयात्रेचं मूळ बनले. तेव्हापासून दरवर्षी या प्रसंगाची आठवण म्हणून रथयात्रा आयोजित केली जाते.
 
तीन देव, तीन रथ, एक श्रद्धायात्रा
रथयात्रेच्या दिवशी पुरीतील मुख्य मंदिरातून भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची मूर्ती मोठ्या थाटात, संगीत आणि वाद्यांच्या गजरात खास तयार केलेल्या तीन भव्य रथांमध्ये ठेवली जातात. हे रथ हजारो भक्तांच्या सहभागाने गुंडिचा मंदिरापर्यंत नेले जातात.
 
गुंडिचा मंदिरात सात दिवस मुक्काम केल्यानंतर देवमूर्ती पुन्हा मुख्य मंदिरात परत आणल्या जातात. या परतीच्या यात्रेला ‘बहुदा यात्रा’ म्हणतात.
 
‘रथ ओढणं’ म्हणजे पुण्यसंचय-
रथ ओढण्याचा मान मिळणं हे अनेक भक्तांसाठी अत्यंत पुण्यप्रद मानलं जातं. असे मानले जाते की, भगवान जगन्नाथाच्या रथाची दोरी ओढणं म्हणजे आपल्या पापांपासून मुक्ती आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग. म्हणूनच, देशविदेशातून आलेले भाविक यामध्ये मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात.
 
या यात्रेतील विशेष बाब म्हणजे देव स्वतः आपल्या भक्तांमध्ये उतरतो. सामान्यतः भक्त देवदर्शनासाठी मंदिरात जातात, परंतु रथयात्रेमध्ये देव स्वतः मंदिराबाहेर येतो आणि आपल्या भक्तांमध्ये मिसळतो. ही परंपरा समता, आपुलकी आणि धार्मिक ऐक्याचं प्रतीक मानली जाते.
 
भक्तिभावाचा चालत-फिरता उत्सव-
पुरीची रथयात्रा ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर ती हिंदू संस्कृतीचा चालत-फिरता महोत्सव आहे. भक्तांच्या गजरात, वाद्यांच्या तालात, आणि टाळ-मृदंगांच्या निनादात हा सोहळा एक अपूर्व आध्यात्मिक अनुभव देतो.
 
दरवर्षी पुरीमध्ये आणि देशाच्या विविध भागांमध्ये ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जगभरातील श्रद्धाळू यासाठी विशेषतः पुरीला भेट देतात. आणि म्हणूनच, पुरीची रथयात्रा ही श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा जिवंत अविष्कार ठरते.