समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू

27 Jun 2025 16:33:19
 
accident on Samruddhi Highway
 (Image Source-Internet)
नाशिक :
समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) पुन्हा एकदा अपघाताची गंभीर घटना घडली आहे. नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा या अपघातात मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी आणि दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत.
 
बुधवारी सुनील हेकरे कुटुंबासह मुंबईहून नाशिककडे मर्सिडीज गाडीतून प्रवास करत होते. इगतपुरी बोगद्याच्या पुढे शहापूर हद्दीत त्यांच्या वाहनाला अपघात झाला. गाडीने तीन वेळा पलटी मारली आणि या अपघातात हेकरे गाडीतून बाहेर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
 
हेकरे यांचे बंधू अनिल हेकरे यांनी केलेल्या माहितीनुसार, महामार्गावर पाणी साचले होते आणि वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही. महामार्गाची बांधकाम गुणवत्ता निकृष्ट असून, अपुऱ्या सुविधांमुळेच ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
अवघ्या काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी-आमणे टप्प्याचे उद्घाटन झाले होते. मात्र त्यानंतर या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, मागील आठवड्यातही एका अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता.
 
महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. रस्त्यावरील अडथळे, साचलेलं पाणी आणि अपुरं आपत्कालीन व्यवस्थापन या सगळ्यांमुळे या महामार्गाची सुरक्षितता सध्या मोठ्या प्रश्नचिन्हाखाली आहे.
Powered By Sangraha 9.0