नागपूरमध्ये भीषण अपघात; मनपाच्या कचरा ट्रकखाली येऊन तरुणाचा मृत्यू

    27-Jun-2025
Total Views |
- महिला व बालकाची आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज

accident in Nagpur(Image Source-Internet)  
नागपूर :
शहरातील वाठोडा परिसरात शुक्रवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच दुचाकीवर मागे बसलेली महिला आणि १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले. तिघंही एका दुचाकीवरून जात असताना, डंपिंग यार्डजवळ मनपाच्या कचरा संकलन करणाऱ्या ट्रकची धडक बसली.
 
अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव नितीन पंचेश्वर (२०) असे आहे. जखमी महिला सारा गाडेकर (४०) आणि आदर्श पाचे (१२) या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पारडी येथील भवानी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
 
अपघात धर्म कांटा परिसरात घडला. मनपाचा ट्रक अचानक वळत असताना मागून आलेली दुचाकी ट्रकच्या मागील चाकांवर आदळली. टक्कर इतकी तीव्र होती की, नितीनचा जागीच मृत्यू झाला, तर महिला आणि मुलगा गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार रस्त्यावर चिखल साचल्यामुळे आणि ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली.
 
घटनेनंतर वाठोडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासासाठी पाठवण्यात आला असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
 
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, रहदारीतील सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे योग्य उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.