चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशातील वास्तवही नजरेआड करता येणार नाही;शरद पवारांचं स्पष्ट मत

27 Jun 2025 14:29:54
 
Sharad Pawar
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्य सरकारच्या शाळांतील हिंदी सक्तीच्या निर्णयावरून वातावरण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षप्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी या मुद्द्यावर संतुलित भूमिका मांडली आहे. पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती अयोग्य असल्याचं ते म्हणाले, मात्र देशातील अर्ध्याहून अधिक जनता हिंदीत संवाद साधते, हेही वास्तव आहे, असं ते स्पष्टपणे म्हणाले.
 
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला अनेक स्तरांवरून विरोध होत आहे. मनसेचे राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत याविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.
 
ते म्हणाले, “हिंदी सक्तीच्या मुद्द्याला दोन बाजू आहेत. एक म्हणजे पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती करणं योग्य वाटत नाही. पण पाचवीनंतर हिंदी शिकवणं योग्य ठरू शकतं. कारण भारतात सुमारे ५० टक्के लोकसंख्या हिंदी भाषा बोलते. त्यामुळे हिंदीला पूर्णतः नाकारणंही योग्य ठरणार नाही.”
 
ठाकरे बंधूंकडून जाहीर करण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होणार का, या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिले. कोणीतरी सांगितलं म्हणून लगेच आंदोलनात सहभागी होता येत नाही. मी मुंबईत गेल्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मांडलेली भूमिका ऐकून घेईन. जर ती महाराष्ट्राच्या हिताची असेल, तर त्यानंतरच योग्य भूमिका घेईन.हिंदी सक्तीवरून सुरू असलेल्या राजकीय हालचालींमध्ये शरद पवारांची ही भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0