नागपूरमध्ये सेक्सटॉर्शन प्रकरणाचा पर्दाफाश; बिहारमधून २० वर्षीय तरुण अटकेत

26 Jun 2025 22:31:12
- ५० लाखांची केली फसवणूक

Sextortion case(Image Source-Internet)  
नागपूर :
नागपूर शहरात सेक्सटॉर्शनचे (Sextortion) एक गंभीर प्रकरण उघडकीस आले असून, २५ वर्षीय तरुणाला जाळ्यात ओढून तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील २० वर्षीय सुंदरकुमार कुंदनकुमार सिंह या तरुणाला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा तरुण दहावी नापास असूनही इंटरनेटच्या माध्यमातून अशा गुन्ह्यांमध्ये तो अत्यंत कुशल असल्याचे उघड झाले आहे.
 
तक्रारदार तरुणाचा संपर्क जानेवारी महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपवर एका युवतीशी झाला होता. तिने स्वत:ला दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनी असल्याचे भासवले. सुरुवातीला साध्या संभाषणाने सुरू झालेली ओळख लवकरच अश्लील चॅटिंगमध्ये बदलली. काही दिवसांतच अश्लील फोटो आणि व्हिडिओचा आदानप्रदान झाला आणि त्यानंतर त्या माध्यमातून तरुणाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात झाली.
 
"हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करू," अशी धमकी देत त्याच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले गेले. या संपूर्ण प्रक्रियेत तरुणाकडून एकूण ४९ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
 
या प्रकाराला कंटाळून पीडित तरुणाने अखेर सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर नागपूर सायबर पोलिसांनी ४ मे रोजी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. चौकशीत बिहारमधील सुंदरकुमार या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांचे पथक तत्काळ बिहारला रवाना झाले आणि आरोपीला अटक करून नागपूरला आणण्यात आले.
 
सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी किती जण सामील आहेत, याचा शोध घेतला जात आहे. नागपूर पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी इंटरनेट वापरताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0