वाहन चालकांना दिलासा;दुचाकीवर टोल नाहीच, नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण

26 Jun 2025 16:18:16
 
Nitin Gadkari
 (Image Source-Internet)
नागपूर :
दुचाकी वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी! केंद्र सरकार दुचाकी वाहनांवर टोल लावण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नाही, असे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी स्पष्ट केले आहे. काही माध्यमांतून पसरलेल्या अफवांवर त्यांनी थेट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर पोस्ट करत खंडन केले.
 
 
 
गडकरींनी सांगितले की, “दुचाकी वाहनांवर टोल लागू होणार” अशा आशयाच्या काही खोट्या बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या स्तरावर असे कुठलेही धोरण किंवा प्रस्ताव विचाराधीन नाही. त्यामुळे दुचाकींसाठी टोलमुक्ती पूर्ववतच राहणार आहे.
 
गेल्या काही दिवसांत काही वृत्तवाहिन्यांनी १५ जुलैपासून दुचाकींसाठीही टोल आकारला जाणार असल्याचे वृत्त प्रसारित केले होते. या पार्श्वभूमीवरच गडकरींनी खुलासा करत अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, चुकीच्या बातम्यांमुळे जनतेत गोंधळ आणि गैरसमज निर्माण होतो.
 
दरम्यान, सध्याच्या नियमानुसार, राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोलपासून सूट देण्यात आली आहे. मात्र, प्रवेश-नियंत्रित महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर दुचाकींचा प्रवेश नियमबाह्य असल्याने तो पुढेही प्रतिबंधितच राहणार आहे.
 
दुचाकीचालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचीच खात्री करावी, असे आवाहन गडकरींनी आपल्या पोस्टद्वारे केले आहे.
Powered By Sangraha 9.0