‘ऑपरेशन थंडर’ची धडक कारवाई; नागपूर पोलिसांकडून ७१४ किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट

    24-Jun-2025
Total Views |

Narcotics stockpile
(Image Source-Internet)
नागपूर :
‘ड्रग्स फ्री नागपूर’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत नागपूर पोलिसांनी आज मोठी कामगिरी बजावली. पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘ऑपरेशन थंडर’ (Operation Thunder) मोहिमेंतर्गत, २६ जून - आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल ७१४ किलो २३० ग्रॅम अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
 
या नष्ट करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये गांजा, मेफेड्रोन, चरस आणि डोडा पावडर यांचा समावेश होता. ही सर्व अमली द्रव्ये MPCB च्या मार्गदर्शक तत्वांनुसार, महाराष्ट्र एन्व्हायरो लिमिटेड, बुटीबोरी (MIDC परिसर) येथे अधिकृतरीत्या नष्ट करण्यात आली.
 
ही कारवाई ५४ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांवर करण्यात आली असून, त्यांचे एकूण मूल्य सुमारे ₹१.३२ कोटी इतके आहे.
 
या उपक्रमाला अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर, पोलिस उपायुक्त (मुख्यालय) अश्विनी पाटील, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपअधीक्षक महादेव भारसाकडे, MPCB अधिकारी, एन्व्हायरो कंपनीचे व्यवस्थापक प्रशांत मस्के, आणि अमली पदार्थ विरोधी पथकप्रमुख निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्यासह संपूर्ण टीमने सहभाग घेतला.
 
या नशा-विरोधी मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही या कारवाईला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली होती. विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले तसेच प्रत्यक्ष नष्टिकरण प्रक्रिया दाखवून जनजागृती करण्यात आली.
 
‘ऑपरेशन थंडर’च्या माध्यमातून नागपूर पोलिसांनी फक्त कारवाईच नाही, तर सामाजिक बांधिलकीही जपली असून, ‘ड्रग्स फ्री नागपूर’ च्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकल्याचे या उपक्रमातून स्पष्ट दिसते.