(Image Source-Internet)
भारताच युवा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असून तिथे दोन्ही देशात पाच कसोटींची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यास २० जून पासून सुरुवातही झाली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी करत ३०० च्या वर धावा काढल्या त्या ही फक्त तीन गडी गमावून. पहिल्याच दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल यांनी शतके झळकावली. उपकर्णधार ऋषभ पंतने अर्धशतक झळकावले. दोघेही पहिल्या दिवशी नाबाद असल्याने दुसऱ्या दिवशी त्यांच्या धावात भरच पडेल कदाचित शतकाचे द्विशतकात आणि अर्धशतकाचे शतकात रूपांतर झाले असेल. असो या आव्हानात्मक आणि दीर्घ दौऱ्याची सुरुवात तर चांगली झाली या बद्दल या युवा खेळाडूंचे अभिनंदन करायला हवे. मी या संघाला युवा संघ असे म्हणतो कारण या संघातील सर्वच खेळाडू युवा आहेत. बुमरा, करून नायर आणि के एल राहुल सोडल्यास सर्व खेळाडू तिशीच्या आतील आहेत. या खेळाडूंना कसोटी सामने खेळण्याचा अनुभव कमी आहे. काही खेळाडू तर पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये खेळत आहेत.
इंग्लंडमध्ये खेळणे हे नेहमीच आव्हानात्मक असते कारण तेथील स्विंग होणाऱ्या चेंडूसमोर भल्या भल्या फलंदाजांचा निभाव लागत नाही. त्यात तेथील हवामान बेभरवशाचे आहे. क्षणात ऊन तर क्षणात पाऊस पडत असल्याने खेळपट्टी नेहमी आपला रंग बदलत असते. शिवाय इंग्लंडच्या खेळपट्टीवर भारताची कामगिरी नेहमीच निराशाजनक राहिली आहे. भारताने इंग्लंडमध्ये शेवटचा मालिका विजय १८ वर्षापूर्वी म्हणजे २००७ साली राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली मिळवला होता. त्यानंतर अनेकदा भारताने इंग्लंडचा दौरा केला मात्र भारताला इंग्लंडमध्ये मालिका विजय मिळवता आला नाही. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळल्या. मालिकेत एखादा दुसरा विजय जरूर मिळाला पण भारताला मालिका खिशात घालता आली नाही. या अठरा वर्षात भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू येऊन गेले. त्यांनी स्वतःच्या धावांच्या राशी उभारल्या, विक्रमांचे इमले रचले पण सांघिक कामगिरी करून इंग्लंडमध्ये मालिका विजय मिळवण्याचा चमत्कार त्यांना करता आला नाही. हा चमत्कार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील हा युवा संघ करू शकेल का ? असा प्रश्न क्रिकेट विश्वात विचारला जात आहे. याचे उत्तर प्रथम दर्शनी नाही असेच देतील कारण हा भारताचा हा संघ युवा आणि अननुभवी आहे. इंग्लंड संघापुढे यांचा निभाव लागणार नाही असेच सर्वांना वाटते मात्र या युवा खेळाडूंनी स्वतःच्या क्षमतेने खेळ केला, आपल्या नैसर्गिक गुणवत्तेला न्याय दिला आणि मागील इतिहास विसरून संघ म्हणून एकजुटीने खेळ केल्यास हा संघ इंग्लंडला हरवून इतिहास घडवू शकतो. तशी क्षमता या संघात निश्चित आहे. या युवा खेळाडूंमध्ये जोश आहे. पण केवळ जोश असून उपयोग नाही. जोश सोबतच होश ही असावा लागतो. कसोटी सामना जिंकण्यासाठी संयम खूप महत्वाचा आहे. टी २० प्रमाणे चौकार षटकार मारून धावा इथे निघत नाही. इथे संयम खूप महत्वाचा आहे.
या खेळाडूंनी संयमाने फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारली आणि गोलंदाजांनी इंग्लंडचे वीस फलंदाज बाद करण्यावर भर दिला तर हा संघ इंग्लंडला निश्चितच आश्चर्याचा धक्का देऊ शकतो. अर्थात यावेळचा इंग्लंडचा संघही पूर्वीतका बलवान नाही. कर्णधार बेन स्टोक्स व ज्यो रूट वगळता त्यांचा एकही फलंदाज नावाजलेला नाही. त्यांची गोलंदाजीही आता पूर्वी इतकी घातक राहिली नाही. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या निवृत्तीनंतर त्यांची जागा घेणारा एकही गोलंदाज त्यांना मिळाला नाही. मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर हे त्यांचे मुख्य वेगवान गोलंदाज दुखापतींने ग्रासले आहेत. ते किती कसोटी खेळतील हे खुद्द ते ही सांगू शकणार नाही. त्यांचा फिरकी गोलंदाजही नवखा आहे त्यामानाने आपली गोलंदाजी खूप चांगली आहे. जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा भारताच्या ताफ्यात आहे तो तीन कसोटी खेळणार आहे त्यामुळे या तीन कसोटीत भारताचे पारडे निश्चितच जड राहील. बुमराला सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग यांची साथ मिळेल. जडेजा, कुलदीप यादव हे जागतिक स्तरावर नावाजलेले फिरकी गोलंदाज भारताच्या ताफ्यात आहे. नितीश रेड्डी आणि शार्दुल ठाकूर हे अष्टपैलू खेळ करण्यात माहीर आहेत त्यामुळे हा संघ जरी नवोदित, युवा खेळाडूंचा असला तरी त्यांनी आपल्या क्षमतेनुसार खेळ केला तर हा संघही इतिहास घडवू शकतो यात शंका नाही. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला मालिका विजयासाठी मनापासून शुभेच्छा!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५