(Image Source-Internet)
नागपूर :
घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'प्रधानमंत्री सूर्यघर योजने' (PM Suryaghar scheme) अंतर्गत नागपूर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 33,641 घरांवर सौर पॅनल्स बसवले गेले आहेत. ही संख्या राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा सर्वाधिक आहे.
या सौर पॅनल्समधून एकूण 132.35 मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता तयार झाली आहे. ही वीज पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक असल्याने घरगुती वापरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
महाराष्ट्रातील चित्र-
महाराष्ट्रातील महावितरणच्या कार्यक्षेत्रात एकूण 2.12 लाख सौर ऊर्जा संच बसवण्यात आले असून त्यामधून 812.76 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण होण्याची क्षमता आहे. मात्र नागपूर जिल्ह्याने या योजनेंतर्गत सर्वाधिक सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
एकाच दिवशी 124 नवीन सौर पॅनल्स-
१५ जून २०२५ रोजी, नागपूरमध्ये एकाच दिवशी 124 सौर ऊर्जा संचांची स्थापना करण्यात आली. या संचांची एकत्रित क्षमता 452.44 किलोवॅट इतकी आहे. हा आकडा जिल्ह्याच्या कामगिरीची आणि वेगवान अंमलबजावणीची स्पष्ट झलक देतो.
नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन-
सौर ऊर्जा ही केवळ विजेची बचत नाही, तर भविष्यातील स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा स्रोत आहे. प्रत्येक नागरिकाने या योजनेचा भाग व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.