(Image Source-Internet)
नागपूर :
नागपूर महानगरपालिकेने (NMC) २०२५ ते २०४५ या पुढील वीस वर्षांसाठी शहराचा नवीन मास्टर प्लॅन तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. तब्बल पंचवीस वर्षांनी शहराचा दीर्घकालीन विकास आराखडा आखण्यात येत असून, नागपूरच्या भविष्यातील लोकसंख्या वाढ आणि नागरी गरजांचा विचार करून नियोजन होत आहे.
नवीन आराखड्यात २०१३ मध्ये मनपा हद्दीत आलेले हुडकेश्वर आणि नरसाळा हे भाग समाविष्ट करण्यात आले आहेत. मागील २००१ च्या मास्टर प्लॅनमध्ये हे भाग नव्हते. मात्र, स्मार्ट सिटी योजनेतील पारडी, पूनापूर, भरतवाडा, भांडेवाडी तसेच मेट्रो रेल्वेच्या विकास क्षेत्रातील अजनी, अंबाझरी, जयताळा, सोमलवाडा, इंदोरा, सिताबर्डी आणि मिहान या भागांना नवीन आराखड्यात स्थान देण्यात आलेले नाही. या परिसरांसाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण कार्यरत असल्याने ते वगळण्यात आले आहेत.
महापालिका शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, रस्ते, उद्याने, पाणीपुरवठा, सांस्कृतिक केंद्रे अशा पायाभूत सुविधांसाठी आवश्यक जागा आरक्षित करणार आहे. हे सर्व नियोजन अत्याधुनिक GIS (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टिम) तंत्रज्ञानाच्या मदतीने केले जात आहे, ज्यामुळे विकास अधिक नियोजनबद्ध आणि वैज्ञानिक पद्धतीने पार पडणार आहे.
आराखड्याचा मसुदा तयार झाल्यानंतर तो नागरिकांसमोर मांडला जाणार असून, त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी दिला जाईल. यानंतर अंतिम आराखडा तयार केला जाईल आणि तो महापालिकेच्या सभागृहात सादर केला जाईल. मंजुरी मिळाल्यानंतर आराखडा राज्य शासनाच्या शहरी विकास विभागाकडे पाठवण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे संकेत आहेत.