(Image Source-Internet)
मुंबई :
सोन्याच्या (Gold) दरात आज पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झाली आहे. शेअर बाजारातील अस्थिरता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागणीमुळे सोन्याच्या किमतीत तब्बल 540 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. चांदीही या तेजीपासून दूर राहिली नाही. तिच्या दरात 595 रुपयांनी वाढ झाल्याने, बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंनी उडी घेतली आहे.त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. विशेषतः लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.
घराबाहेरील बाजारात चांदीने अधिक आक्रमक वाढ दाखवत 2,400 रुपयांनी झेप घेतली आणि प्रति किलो 1,09,325 रुपयांवर पोहोचली. दुसरीकडे, सोन्यानेही मागे न राहता प्रति 10 ग्रॅम 1,09,590 रुपयांपर्यंत मजल मारली.
आज 24 कॅरेट सोन्याचा दर 540 रुपयांनी वाढून 1,00,910 रुपये झाला आहे, तर 22 कॅरेट सोनं 500 रुपयांनी महागून 92,500 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने विकले जात आहे. 18 कॅरेट सोन्याचाही दर 410 रुपयांनी वाढून 75,690 रुपये इतका झाला आहे.
मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांमध्येही हीच किंमत नोंदवली जात असून, बाजारात खरेदी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी झपाट्याने वाढ झाली आहे. सोन्याचा दर सध्या 3,400 डॉलर प्रति औंसच्या आसपास स्थिरावला आहे, तर चांदीने तब्बल 14 वर्षांनंतर 37 डॉलरचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
सोनं आणि चांदी दोन्हींचे दर सातत्याने चढत असल्याने, नागरिकांनी दररोजचे बाजारभाव तपासूनच गुंतवणुकीचे निर्णय घ्यावेत, असे संकेत तज्ज्ञांकडून दिले जात आहेत.